Tuesday, February 27, 2024

पैलतोघे काऊ कोकताहे - ज्ञानेश्वर

 'पैलतोघे काऊ कोकताहे' या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थ सांगू शकाल का?


आपण विचारलेल्या अभंग संपूर्ण असा आहे.




पैल तो गे काऊ कोकताहे ।


शकुन गे माये सांगताहे ॥१॥


उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।


पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥


दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।


जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥


दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।


सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥


आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।


आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥


ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।


भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥




रामकृष्णहरी




वरील अभंग हा योगीराज माऊलींचा आहे . या अभंगात जगरीती प्रमाणे शकुन सांगतात ,ऐकतात किंवा शकुन मानतात असा एक अर्थ भरलेला आहे . तसाच दुसऱ्या अर्थाने विचार केला तर या अभंगात अध्यात्मिक साधनेत येणारे अनुभव सांगितले आहेत. थोडक्यात हा अभंग गूढार्थाने भरलेला आहे. आधी आपण शब्दार्था प्रमाणे विचार करू त्यानंतर गूढार्थाकडे जाऊ .


लहानपणा पासून घराच्या अंगणातील झाडावर किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात कावळा ओरडत असला की आज पाहुणा येणार अशी आमची आजी सांगायची आणि खरोखरचं त्यादिवशी कुणीतरी पाहुणा येत असे यालाच कावळा शकुन सांगतो असे म्हणतात. हे तेव्हा सर्वमान्य होत.


एखादी सासुरवाशीण असेल तर ती कावळ्या कडे नेहमी लक्ष ठेऊन असायची कारण तीला तिच्या माहेराहून कुणीतरी न्यायला येईल याची आस असायची ती मनातल्या मनात म्हणत असे की अरे कावळ्या माझा पिता , माझा भाऊ मला न्यायला येईलका हे मला एकदा सांग मी तुला दूध भात खायला देईन. नाहीतर तुला वाटीभर दूध प्यायला देयेईल. सत्य सांग माझा पिता मला घ्यायला येईल का ? माझा जीव कासावीस झाला आहे म्हणून तू लवकर सांग. हीच लोक भावना माऊलींनी आपल्या अभंगातून सांगितली आहे. माऊलींचे असे अनेक अभंग आहेत लोकभावनेतून अध्यात्म सांगणारे. वरील अभंगाचा शब्दार्थ घेतला तर फक्त लोकभावना समजेल त्यातील शकुन समजेल म्हणून आपण माऊलींना नक्की काय सांगायचं आहे हे समजून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत.


माऊलींचा हा पूर्ण अभंग त्यांच्या साधना काळातील आहे असे यातील शब्द रचनेवरून वाटते.


*पैल तो गे काऊ कोकताहे ।*


*शकुन गे माये सांगताहे ॥१।।*




या ओवीत माऊली कावळ्याला काऊ असे प्रेमाने संबोधत आहेत. या ओळीतून ज्ञानेश्वर माऊली नक्की कोणत्या काऊचं वर्णन करतात हे सदगुरु कृपेने जाणून घेणार आहोत. जे साधक ध्यान करतात त्यांना काही कालांतराने अनाहत नाद ऐकू येतो त्याला माऊलींनी कावळ्याची उपमा दिली आहे. ते या अनाहत रुपी कावळ्याला सांगतात की अरे बाबा तू फक्त ओरडू नको तर मला योग्य तो शकुन सांग ,माझ्यासाठी संदेश काय आहे तो सांग. मला कधी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन होईल. (पांडुरंग या शब्दाचा अर्थ आहे . पांढरा रंग )




*उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।*


*पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥*




या ओळीत माऊली साधकाला येणारे अनुभव सांगतात , काऊचे पाय सोन्याने मढविन असे सांगतात म्हणजे ध्यान करताना साधकाला सोनेरी रंग दिसतो. त्याचे माऊली यथासांग अनुभवाचे बोल आपणास सांगतात की तुम्ही जेव्हा सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने ध्यान करीत रहाल तेव्हा कोकताहे काऊ याचा अर्थ आपल्या अनाहत नादाशी आहे हे लक्षात येईल एकदा नाद सुरू झाला की, त्या नंतर पंढरीच्या विठोबाचे प्रकाश रुपाने नक्की दर्शन होईल यात शंका नाही. म्हणजे आपल्या कर्णरंध्रात जो नादरूपी कावळा आपल्याला शकुन सांगतो त्याचे मर्म साधकाला समजून घ्यावं लागेल. हे सर्व सदगुरु आपणास प्रत्यक्ष अनुभवास आणून देतात हेच माऊलींनी त्यांच्या अनुभवातून सांगितले आहे.


पुढील दोन ओवीत माऊली ध्यानात असताना जे जे दृश्य दिसते तेच आपणास सांगतात फक्त त्यांनी कावळा हे रूपक वापरून सांगितलं आहे . (यालाच नाथांच्या घरची उलटी खूण असे म्हणतात. )


*दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।*


*जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥*


*दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।*


सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥*




आता माऊलींना आत्मरूपाचे म्हणजे विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. माझ्या जीवाला ज्याची गोडी चाखायची आहे. ध्यान करताना मला दहिभाता सारखा पांढरा प्रकाश दिसतो तोच मी तुला भरवणार आहे.म्हणून तू मला लवकर आत्मरूपी विठुरायाच्या चरणी घेऊन जा.


नादरुपी काऊला माऊली सांगतात अरे बाबा तू मला सत्यगोष्ट सांग आणि लवकर सांग मला विठ्ठलाचे दर्शन कधी होईल. मला ध्यानात दुधासारखा प्रकाश दिसतो त्याची वाटी भरून तुला देईन असे ते नादरूपी काऊला सांगतात.




आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।


आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥


ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।


भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥




माऊली म्हणतात अरे काऊ तू जसा आंब्याच्या झाडावरील रसाळ पिकलेला आंबा तू एक भरारी मारून त्यातील मधुर रस खतोस त्याच प्रमाणे माझ्या सद्गुरूंनी मला रसाळ रस खाण्या साठी युक्ती शिकवली आहे. त्याप्रमाणे रोज ध्यान करतो. म्हणून तू आताच मला शकुन सांग की माझे विठुराया कधी भेटतील. माऊली दुसऱ्याच ओवीत सांगतात की नादरुपी काऊ तू लवकर उडत उडत जाऊन माझ्या आत्मरूपी देवाला जाऊन सांग की भक्त तुझ्या दर्शनाची आस लावून बसला आहे धावत येऊन भेट ध्यावी.


माऊली म्हणतात जो या गूढ खुणा जाणिल व गूढ शकुन ओळखिल त्यालाच आत्मरुपाचं दर्शन होईल.


माऊलींच्या या अभंगाचं विश्लेषण माऊलींच्या कृपेने व माझे सदगुरु बबनदादा यांच्या आशीर्वादाने करता आलं हेच माझं भाग्य आहे.


गुरुदास

माझा मराठीची बोलू कौतुके

आज 27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिवस. सकाळी माझ्या पत्नीने त्या निमित्त तिने शाळेत असताना अभ्यास केलेली ज्ञानेश्वरी मधील ही ओवी अणि त्याचा अर्थ सांगितला अणि तिचे कौतुक वाटले.

मराठी भाषे विषयी नुकताच एक सुंदर लेख वाचनात आला.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। या संत ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या चरणाचा अर्थ काय आहे?

संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात,


माझा मराठीची बोलू कौतुके।


परि अमृतातेहि पैजासी जिंके।


ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।। ज्ञाने. ६/१४


असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही.

माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।१४।।ज्ञानेश्वरी अध्याय सहावा.


योगमार्गाचे संस्कृत ग्रंथातील वर्णन पारिभाषिक(Jargon words) शब्दात आहे.ते पारिभाषिक शब्द जसेच्या तसे न वापरता, प्राकृतात (मराठीत)योगमार्गाचे वर्णन ऐकायला ,जाणते ,रसिक श्रोते तयार होतील का?ह्या शंकेचे समाधान प्रस्तुत ओवीत आहे.सध्याच्या काळात देखील हा प्रश्न अनेकांना पडतो.अधुनिक शास्त्रे इंग्लिश मधे आहेत, त्यातील विषय मराठीतून अचूक कसे व्यक्त होतील?


जेव्हा संत ज्ञानेश्वर गीतार्थ सांगण्यास सुरु करतात तेव्हा श्रोते म्हणतात"हा आठरा (काहींच्या मते सोळा),वर्षाचा मुलगा प्रयत्न करतो आहे ह्याचे कौतुक आहे.पण ते वर्णन जाणत्या रसिक श्रोत्यांना कितपत रुचेल?"ज्ञानोबा म्हणतात "श्रोतेहो,जरादेखिल शंका नको.मी अशी शब्दयोजना करेन की,मी केलेले वर्णन चांगले की अमृत? अशी स्पर्धा लावली तर मी केलेले वर्णन जिंकेल."


मराठीची भलावण ज्ञानेश्वरीत इतर आध्यायांतदेखिल आहे.उदाःआध्याय९ओवी२२.


बाकीचे सारे इतर सोपे करून सांगतीलच पण इथे नेहेमी एक गल्लत होते ती म्हणजे मेळवीन च्या ऐवजी मिळवीन असे लिहितात/ बोलतात. मेळवीन म्हणजे मेळ घालीन योजना करेन असे आहे.


मातृभाषेचा वाहता झरा ज्ञान देई सर्वा खरा


संत बहिणाबाई यांचा संत साहित्याशी काय संबंध आहे? या संबंधित काय पुरावे आहेत?

संत ज्ञानेश्वरांचे विचार मला कोठे वाचायला मिळतील?

ज्ञानेश्वरांनी एकविसाव्या वर्षी समाधी का घेतली?

संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आपणास किती माहिती आहे?

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानाचा गाभा काय आहे?

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये "मराठी" शब्दाचा उल्लेख कोठे आहे?

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपीका) मध्ये सहाव्या अध्यायात "मराठी" या शब्दाचा उल्लेख आढळतो.


"तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।

सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥ १३ ॥


माझा मराठीचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंके ।

ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥


जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।

वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥


ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।

बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥ १६ ॥


सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥


नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।

ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥ १८ ॥"


अशा प्रकारे संत ज्ञानश्वरांनी मराठी भाषेचे गोडवे गायिले आहे.

स्रोत :-

ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपीका) 

quora 

Ghats in Maharashtra - Mountain Passes

  A   ghat  is nothing but a mountain pass. The term “Ghat” describes the mountain pass in Maharashtra. They pave the way for passage from o...