बेंगलोरमधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी - मल्लेश्वरम - येथील हे प्राचीन मंदिर. या मंदिरात नंदीचे मुख हे दक्षिण दिशेला असल्याने दक्षिणमुखी नंदी तीर्थ असे नाव देण्यात आले. या मंदिराचा इतिहास हा रोमांचकारी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर जीथे आहे तो प्लाॅट १९९७ पर्यंत खाली होता. जमीनीवर काही झुडपे वाढली होती. १९९७ साली काही बांधकाम करण्याच्या उद्देशाने साफसफाई करत असताना प्रथम नंदीची शिंगे दृष्टीस पडली. त्यानंतर हळूहळू बाजूने खोदले असता पूर्ण नंदीची मूर्ती मिळाली. या नंदीच्या मूर्तीची साफसफाई करताना एक अद्भुत गोष्ट घडली. नंदीच्या अंगावरील सर्व माती साफ केली आणि तोंडात जमलेली माती काढली असता नंदीच्या तोंडातून पाण्याची धार वाहू लागली. हा चमत्कार पाहून लोकांनी पुरातत्व खात्याला कळविले. पुरातत्व विभागातील तज्ञांनी भेट देऊन हळूवारपणे उत्खननास सुरुवात केली. नंदीच्या मुखातून सतत पाणी येतच होते. ज्यावेळी पूर्ण उत्खनन झाले त्यावेळी हे मंदिर उजेडात आले. या मंदिराची रचना ही पूर्णपणे वेगळी आहे. नंदी वरती असून शंकराची पिंड खाली आहे. नंदीच्या मुखातून जे पाण...